सेक्स विझलेली लग्नं! अर्थात, सेक्सलेस मॅरेजेस
- डॉ प्रदीप पाटील.
बलदंड शरीराचा इंग्रजी सिनेमातील हिरो अरनॉल्ड श्वारझेनेगर आपल्याला 'टर्मिनेटर' सिनेमात भावला होता.. त्याचे पिळदार स्नायू आणि ताकद म्हणजे आपल्यातला खरा पुरुष वाटतो.. त्याची बायको मारिया श्रीव्हर ही त्याच्यावर जाम फिदा असेल असा आपला कयास असणार..
पण तो संपूर्ण बरोबर नाहीय !
'शक्यच नाही' असे तुम्हाला वाटेल..
पण होय खुद्द अर्नोल्डच म्हणाला होता...
"आमचे मॅरेज 'सेक्सलेस' होते. म्हणजे आम्हा दोघांतला सेक्समधील इंटरेस्ट संपला होता."
अरनॉल्ड असे म्हणतो तर मग सामान्य पुरुषांचे काय असेल?
नंतर तो आणि श्रीव्हर वेगळे झाले, हा भाग वेगळा.. असो..
लग्नानंतर काही काळानंतर आमच्यातील सेक्स संपला असे म्हणणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पूर्वी ही फक्त पुरुषांची ओरड होती. (कारण स्त्रिया फारशा बोलू शकायच्या नाहीत).. घरोघरी पुरूषांना आपली बायको थंड वाटत असे, आता मात्र स्त्रियांनाही पुरुषांत दम नाही असे वाटू लागले आहे.
लैंगिक संबंधांची इच्छाच होत नाही असे काही घडू लागलेय.
सुस्थितीत असलेल्या अनेक जोडप्यात हीच समस्या आहे. समाजात व कामाच्या ठिकाणी वावरताना दोघेही असे दाखवून देत आहेत की आम्ही खूप छान राहतो.. आम्ही आयडियल कपल आहोत... दोघेही नोकरी करत आहोत... पैशांचा सवालच नाही... पण तरीही आज वयाच्या तिशीत, लग्नानंतरच्या आठ वर्षांनी, त्यांच्यातला सेक्स विझलाय !!
"असं नाहीये की आमच्यातील एकमेकांविषयीच्या भावना मेल्यात. पण लैंगिक आकर्षण मात्र निश्चितच कमी झालंय. मग आम्ही दोघेही सेक्स व्हावा म्हणून खूप प्रयत्न करतो. पण दिवसेंदिवस परिस्थिती बिघडतच चाललीय. त्यामुळे आम्ही आमच्या कामात स्वतःला बुडवून टाकले आहे." असं एक उच्चशिक्षित स्त्री म्हणते. " एक क्षण असा आला की आम्ही आता वेगळे व्हावे. डायव्होर्स घ्यावा.. असे आम्हास वाटू लागते. मी माहेरी जाऊन राहू लागले. पण घरच्यांनी मला परत पाठविले. मग दोघांनी कौन्सेलरला जाऊन भेटण्याचा निर्णय घेतला. "
अशा हजारो केसेस आहेत ज्या गोंधळलेल्या आहेत.
आपल्या संस्कृतीत लग्न हीच एक गोष्ट सेक्ससाठीची पहिली आणि अंतिम परवानगी आहे असे तत्वज्ञान (अनेक कारणांनी) रुजले आहे. त्यामुळे लग्नात वेगळेपण होणे शक्यच होत नाही.
यापण वेगळं पाऊल उचललं तर समाजात नावे ठेवली जातील म्हणून बहुतांश जण हे सेक्सलेस मॅरेज कंटिन्यू करतात, तर काही जण/जणी आर्थिक कारणांसाठी आपले लग्न खेचत राहतात.
माझ्याकडे कौंसेलिंग साठी आलेली एक स्त्री सांगत होती, "पंधरा वर्षांपूर्वी माझे लग्न झाले. त्यातून बाहेर पडण्याचे ठरवत राहिले पण पडू शकले नाही कारण बाहेर पडल्यावर जायचे कुठे हा प्रश्न होता! अगदी सुरुवातीचे काही महिने चांगले गेले पण नंतर नंतर आमच्यातला सेक्स कमी कमी होत गेला. प्रत्येक वेळी मी सुरुवात करायचे पण तो ढिम्म असायचा. मी मग त्याच्यावर चिडत असे. त्याच्या कुटुंबावर त्रागा करीत असे. (कारण त्याचे आई-वडील आमच्या घरीच राहत). म्हणुन मग आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. पण तेथेही काही फरक पडला नाही. मग मला वाटले की आपणास मूल झाल्यावर फरक पडेल. म्हणून मी निर्लज्जपणे त्याला सेक्स करायला भाग पाडीत असे. पण मला दिवस गेल्यावर ही त्याने माझी विशेष अशी कोणतीही काळजी घेतली नाही. म्हणजे माझे लग्न फक्त 'सेक्सलेस'च नव्हते, तर ते भावनाहीन (इमोशनलेस) देखील होते. त्याच्या भावना मला फक्त तेव्हाच जाणवल्या जेव्हा मी त्याला सांगितले की मी आता त्याला सोडून जात आहे. त्या वेळी मला अतिशय लाजिरवाणे वाटले आणि मेल्याहून मेल्यासारखे झाले..."
याचा अर्थ असा आहे की, असे अनेक जण आहेत की ते लग्नात सुखी असल्याचे नाटक करीत आहेत. कारण समाजाला काय वाटेल याचा ते प्रथम विचार करतात. शिवाय समाजात 'घटस्फोट' हा शब्द घाबरविणारा आहे आणि तो वाईटही समजला जातो. त्यामुळे त्याच्या वाट्याला जाण्यास ताकदच उरत नाही.
आताच्या काळात मात्र खूपच बदल घडू लागले आहेत. तिथे आजकाल असा विसंवाद निर्माण झाला की एकमेकांना बाय-बाय केले जात आहे. याचं प्रमाण अत्यल्प असलं तरी, अनेक जण या बाबतीत बोल्ड झाले आहेत. याबाबतीत विशेष गोष्ट ही आहे की स्त्रिया देखील या बाबतीत पुढाकार घेत आहेत. त्या थेट व स्पष्टपणे सांगत आहेत की माझ्या नवऱ्यात लैंगिक असामर्थ्य आहे. जेव्हा त्यांना सल्ला देण्यात येतो तेव्हा पुरुषास पटवून देणे महाकठीण काम बनते.
सेक्सलेस मॅरेजेसची संख्या दहा वर्षांत पूर्वीपेक्षा सहा पटीने वाढली आहे.
१. मुलं लवकर झोपत नाहीत,
२. एकांत मिळत नाहीत,
३. वेळ मिळत नाही, आणि
४. आम्ही खूप दमतो..
ही चार कारणं त्यासाठी अग्रगण्य आहेत..
Comments
Post a Comment